- कुंदन पाटील
जळगाव : धुळे पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना कायद्याने रंग दाखविला आहे. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात गुन्हा दाखल झाल्याने दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, तर प्रभारी पोलिस अधिकाऱ्याशी हुज्जत घातल्याचा ठपका ठेवत भुसावळच्या दोघांसह तिघांना तातडीने नियंत्रण जमा करण्यात आले आहे.
एरंडोल पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात जुबेर रशीद पठाण (समर्थ कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे), त्याचा भाऊ व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील पोलिस कर्मचारी रफीक रशीद पठाण व राहुल सानप यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संजय रमेश पाटील या शिक्षकाच्या दुचाकीसह तीन दुचाकी या तिघांकडे आढळून आल्या. तसेच नंबरप्लेटवर खाडाखोड केल्याचेही उघड झाले. या गुन्ह्याच्या तपासात तब्बल तीन दुचाकी हाती लागल्याने पोलिस खात्याला धक्का बसला आहे.
तिघे नियंत्रण कक्षात
दरम्यान, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याशी सुटीसाठी वाद घातल्याचा ठपका ठेवत महिला कर्मचारी गीता कश्यप, तसेच अरेरावी केल्याने सहायक फौजदार शरीफोद्दीन काझी व महिलेशी असभ्य वर्तनाचा ठपका ठेवत रावेरचे वाहेद तडवी बिस्मिल्ला तडवी यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.