नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी अनिल चौहान (५२) नावाच्या एका चोराला पकडले आहे. त्याच्यावर २७ वर्षांमध्ये तब्बल ५००० हून जास्त गाड्या चोरल्याचा आरोप आहे. कार चोरीव्यतिरिक्त अनिलवर खून, शस्त्रास्त्र कायदा आणि तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. तो देशातील सर्वात मोठा कार चोर असल्याचा पोलिसांचा दावा आहे.आरोपीला सोमवारी मध्य दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने देशबंधू गुप्ता रोड परिसरातून टीप मिळाल्यानंतर अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो उत्तर प्रदेशमधून शस्त्रे आणून नागालँडमधील प्रतिबंधित संघटनांना पुरवत होता. त्यामुळे पोलीस दहशतवादाच्या दृष्टिकोनातूनही तपास करत आहेत.
अमाप संपत्ती : चाैहान हा आसामला गेला आणि तिथे राहू लागला. चोरीद्वारे बेकायदा संपत्तीच्या जोरावर त्याने दिल्ली, मुंबई आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मालमत्ता जमवली. अंमलबजावणी संचालनालयानेही त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. अनिलला अनेक वेळा अटक करण्यात आली होती. २०१५ मध्ये काँग्रेस आमदारासोबतही त्याला अटक झाली हाेती.
रिक्षा चालवायचा...- अनिलने ९०च्या दशकात सर्वाधिक गाड्या (मारुती ८००) चोरल्या होत्या. चोरीदरम्यान त्याने काही टॅक्सी चालकांनाही ठार केले. चोरलेल्या गाड्या तो जम्मू-काश्मीर, नेपाळ आणि ईशान्येकडील राज्यांत विकायचा. - १९९० मध्ये तो दिल्लीच्या खानपूर भागात राहत होता आणि ऑटो रिक्षा चालवायचा. त्यानंतर तो गुन्हेगारीच्या जगात आला आणि कार चोरायला सुरुवात केली, नंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
तीन पत्नी आणि सात मुलेअनिलवर १८० गुन्हे दाखल असून त्याच्या तीन पत्नी आणि सात मुले आहेत. तो आसाममध्ये सरकारी कंत्राटदार बनला होता. पोलिसांनी त्याच्याकडून सहा पिस्तूल आणि सात काडतुसे जप्त केली आहेत.