उद्धव गोडसे
कोल्हापूर : व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकासह वन विभागाच्या अधिका-यांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. १०) दुपारी दसरा चौक येथे सापळा रचून करण्यात आली. माधव विलास सूर्यवंशी (वय ३८, रा. बेडकीहाळ, ता. निपाणी, जि. बेळगांव) आण अविनाश सुभाष खाबडे (वय ३२, रा. लिशां हॉटेल, कोल्हापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक कोटी ८० लाख रुपये किमतीचे अंबरग्रीस, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले, व्हेल माशाच्या उलटीसदृश्य वस्तूची विक्री करण्यासाठी दोन तरुण कोल्हापुरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी दसरा चौकात सापळा रचण्यात आला. दसरा चौकात संशयितरित्या वावरणारे माधव सूर्यवंशी आणि अविनाश खाबडे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वस्तूंबद्दल विचारणा केली असता त्यांना योग्य उत्तर देता आले नाही. संशयावरून ताब्यात घेतलेल्या दोघांकडे अधिक चौकशी केल्यानंतर ते अंबरग्रीसची विक्री करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी त्यांच्याकडून एक किलो ८०० ग्रॅम वजनाचा व्हेल माशाचा उलटी सदृष्य पदार्थ जप्त केला. त्याची किंमत एक कोटी ८० लाख रुपये आहे. विक्री आणि तस्कारीसाठी या पदार्थावर बंदी असतानाही त्यांनी तो कोणाकडून आणला, कोणाला विकणार होते, याची चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी सांगितले. उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे, प्रकाश पाटील, हरीष पाटील, राजेश राठोडे, शिवानंद मठपती, संजय पडवळ, संतोष पाटील, रफिक आवळकर यांचा पथकात सहभाग होता.