दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: येथील शाहूनगर, जगतापवाडी परिसरात राहणारे सागर नामदेव पाटील (वय ४१, मूळ रा. काळम्मावाडी वसाहत कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सात लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर पाटील हे जलसंपदा विभागात नोकरी करतात. साताऱ्यातील शाहूनगर परिसरात ते भाड्याने घर घेऊन राहत आहेत. दि. ११ मेरोजी ते कुटुंबासह गावी गेले होते. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता ते साताऱ्यातील घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली. तसेच पंचनामाही केला.
चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा, कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले ७ तोळ्यांचे गंठण, ७ तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस तसेच दागिने खरेदीच्या पावत्या, असा सुमारे ७ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
बँकेतील लाॅकरमधून घरी आणले दागिने
सागर पाटील यांनी त्यांचे दागिने बँकेतील लाॅकरमध्ये ठेवले होते. मात्र, नातेवाइकांचे लग्न असल्याने या लग्नासाठी त्यांनी लाॅकरमधून दागिने घरी आणून ठेवले होते. शाहूनगरमधील जगतापवाडी परिसर निर्जन ठिकाण असून, चोरट्यांनी बंद घर हेरून चोरी केली असावी, असे पोलिसांनी सांगितले.