खामगाव: येथील शहर पोलीस स्टेशनचा नवनियुक्त पोलीस निरिक्षकांनी पदभार स्वीकारताच शहरातील अवैध व्यावसायिकांवर सिमग्यापूर्वीच संक्रांत कोसळली आहे. शहरातील आठ ते नऊ ठिकाणी सोमवारी सकाळपासूनच शहर पोलीसांनी धरपकड सुरू केली. यात २५ ते ३० जणांना शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यामुळे शहरातील अवैध व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव शहर आणि परिसरात काही गत काही दिवसांत अवैध धंदे वाढीस लागले आहेत. शहरात अवैध दारू, मटका, जुगार आणि चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहे. मोबाईल चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याची वस्तुसि्थती असतानाच, शुक्रवारी शहर पोलीस स्टेशनचे मावळते पोलीस निरिक्षक प्रदीप त्रिभुवन यांची बुलडाणा येथे बदली झाली. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी नवनियुक्त पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांनी शनिवारी दुपारी पदभार स्वीकारला. पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहर पोलीस ॲक्शनमोडवर आले. अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी सोमवारी दुपारपर्यंत तब्बल ९ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यात वरली अड्डे चालविणारे आणि वरली खेळविणार्या २५ ते ३० जणांची धरपकड सुरू केली. त्यामुळे अवैध व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अवैध व्यावसायिकांना पोलीस स्टेशनमध्ये पकडून आणल्याची वार्ता शहरात वार्याच्या वेगाने पसरली. त्यानंतर काही राजकीय पुढार्यांनी शहर पोलीसांत धाव घेतली.
जुगार आणि वरली व्यावसायिकांना केले लक्ष्य्
सोमवारी सकाळपासूनच शहर पोलीसांनी खामगाव शहरातील प्रमुख ७ पेक्षा अधिक व्यावसायिकांना लक्ष्य केले. अनेकांची धरपकड सुरू झाल्याने, काही पोलीस कारवाईपूर्वीच आपला गाशा गुंडाळून घटना स्थळावरून पोबारा केला. तर काहींना पोलीसांमधील झारीतील शुक्राचार्यांनी सतर्क केले. त्यामुळे धरपकड करण्यात आलेल्यांच्या संख्येत घट झाल्याची जोरदार चर्चा दबक्या आवाजात पोलीस वतुर्ळात होत आहे.
अनेकजण झालेत सतर्क
शहरातील आठवडी बाजार, टिळक मैदान, शाळा क्रमांक सहा समोरील गल्ली, बस स्थानक, नगर पालिका परिसर आणि मुख्य बाजारपेठेतील काही व्यावसायिकांसह शंकर नगर, हरिफैल, कोठारी फै लातील काही जुगार्यांना पकडून पोलीसांनी कारवाई केली. शहरातील काही ठिकाणी कारवाई सुरू असतानाच, काहींना अवैध व्यावसायिकांकडून काहींना शुक्राचार्यांनी सतर्क केल्याची चर्चा होती.