नंदुरबार : निलंबनातून कामावर हजर करून घेत नाही म्हणून वाद घालत दोघा वाहकांनी आगार व्यवस्थापकांना बेदम मारहाण केल्याची घटना अक्कलकुवा एस.टी.आगारात मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, अक्कलकुवा आगारातील वाहक सतीश नाथराव मुंडे (४०) व राहुल अंकुश गायकवाड (४५) यांचे निलंबन करण्यात आलेले होते. निलंबन रद्द करून कामावर हजर करून घ्यावे यासाठी दोन्ही वाहक आगार व्यवस्थापक रवींद्र बाळासाहेब मोरे (४२) यांच्याकडे गेले होते. त्यांच्या दालनात त्यांनी कामावर घेण्यासंदर्भात मागणी केली. त्यावरून वाद झाला आणि दोघांनी दालनातच मोरे यांना मारहाण केली. मोरे दालनाबाहेर निघाले असता तेथेही मारहाण करण्यात आली.
या झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून नुकसान झाले. याप्रकरणी आगार व्यवस्थापक रवींद्र मोरे यांनी फिर्याद दिल्याने वाहक सतीश नाथराव मुंडे व राहुल अंकुश गायकवाड यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार जितेंद्र महाजन करीत आहेत.