अहमदाबाद : सुरत बलात्कार प्रकरणात न्यायालयाने कथित संत आसाराम बापूला दोषी ठरविले होते. आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 22 वर्षे जुने प्रकरण आणि 10 वर्षे जुन्या खटल्याच्या सुनावणीवर निकाल आला आहे.
याआधी आसाराम बलात्काराच्या आणखी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा दोषी सिद्ध झाल्याने त्याच्या अडचणी वाढणार आहेत. 2001 मध्ये सुरतच्या दोन मुलींवर आसाराम बापूने बलात्कार केला होता. या प्रकरणी २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने एकूण 68 जणांचे जबाब नोंदवले. या प्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने सहा आरोपींना निर्दोष ठरवत आसारामला दोषी ठरवले आहे.
गांधीनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आसारामला व्हर्च्युअली हजर करण्यात आले होते. या प्रकरणात आसारामवर सुरतच्या दोन मुलींनी बलात्काराचा आरोप केला होता. न्यायालयाने प्रदीर्घ सुनावणीनंतर आरोप योग्य ठरवले आणि आसारामला दोषी ठरवले. लहान बहीणीने आसारामचा मुलगा नारायण साई याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्याला देखील शिक्षा झाली आहे. आसाराम व्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आसाराम सध्या जोधपूर तुरुंगात आहे.
आसारामचे वकील उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बलात्काराच्या दुसऱ्या खटल्यात आसारामचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. वृद्ध आहे, अनेक प्रकारचे आजार आहेत, अशा स्थितीत त्याला जामीन मिळण्याचा अधिकार आहे, अशी कारणे देण्यात आली होती. परंतू न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नव्हता. यामुळे आसारामला पुन्हा दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.