नरेश डोंगरे
नागपूर : कुख्यात गुन्हेगार गमछू ऊर्फ महेश नामदेव लांबट (वय ५०) याची हत्या करण्यासाठी आरोपी अश्विन शाहू आणि सुनील भगत या दोघांनी कुख्यात गुंड पीयूष मलवांडे याला १५ लाखाची सुपारी दिली होती. आरोपींनी गमछूचा गेम करून ही सुपारी फोडली. मात्र, रक्कम मिळण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्याने सुपारी घेऊन गमछूचा गेम करणारे आणि सुपारी देणारे असे सर्वच जण कोठडीत पोहचले आहेत. लोकमतने पहिल्याच दिवशी गमछूची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.
कुख्यात गमछूची १४ सप्टेंबरला हत्या करण्यात आली होती. कधीकाळी गमछू नागपुरातील बहुचर्चित मांडवलीकार सुभाष शाहू याच्या अवतीभवती फिरायचा. नागपुरातील बहुतांश अट्टल गुन्हेगार, गँगस्टर आणि पोलिसांमधील दुवा म्हणून सुभाष शाहू ऊर्फ पेपसी काम करत होता. मोठमोठ्या प्रकरणात तो मांडवली करायचा. त्यातून त्याने लाखोंची माया जमविली होती. सुभाषशिवाय अनेकांचे पान हलेनासे झाल्याने तो अनेक गुन्हेगारांना खटकत होता. त्यामुळे सप्टेंबर २०११ मध्ये त्याची काही जणांनी सिनेस्टाईल हत्या करवली. एका साधूने प्रसाद म्हणून सायनाइडयुक्त पदार्थ खाऊ घालून सुभाषचा गेम केला होता. तब्बल दोन ते अडीच वर्षांच्या तपासानंतर तत्कालीन गुन्हे शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या प्रकरणात गमछू आणि साधूचा वेश करणाऱ्या लकी खानला अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. न्यायालयाने लकीला या प्रकरणात आजन्म कारावास सुनावला होता, तर गमछूला दोषमुक्त केले होते. त्यानंतर गमछूने आपला प्रभाव निर्माण करतानाच मोठी मालमत्ताही जमविली होती. सुभाष शाहूचा पुतण्या अश्विन शाहू आणि त्याचा मित्र प्रॉपर्टी डीलर सुनील भगत यांना गमछू सारखा खटकत होता. त्यामुळे या दोघांनी गमछूची हत्या करण्याचा कट रचला आणि पीयूष मलवांडेला १५ लाखात सुपारी दिली. त्यानुसार, पीयूषने साथीदारांची जमवाजमव केली आणि १४ सप्टेंबरला रात्री ८.३० च्या सुमारास गमछूवर घातक शस्त्राचे घाव घालत त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. नंतर दगडाने ठेचून त्याला जागीच संपवले. ‘लोकमत’ने गमछूचा गेम सुभाष शाहू हत्याकांडाची कडी असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर, पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे स्वत:च हातात घेऊन गमछू हत्याकांडाची गुंतागुंत सोडवत पीयूष यश मलवांडे, लोकेश येरणे, चिड्या ऊर्फ वैभव बांते आणि अन्य एका अल्पवयीन आरोपीला अटक केली. त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबानंतर सुपारी देणारे अश्विन शाहू आणि सुनील भगत यांनाही अटक केली.
सुपारी फोडल्यानंतर ढाब्यावर पार्टी
सुपारी घेणारा आरोपी पीयूष मालवंडे आणि त्याचे तीन साथीदार तीन दिवसांपासून गमछूच्या मागावर होते. अखेर त्यांनी गमछूची सुपारी फोडली. त्या रात्री आरोपींना अश्विन आणि सुनीलने तीन हजार रुपये दिले. आरोपींनी एका ढाब्यावर ओली पार्टी केली. दुसऱ्या दिवशी काही रक्कम देण्याचे ठरले होते. मात्र, पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या बांधल्याने १५ लाखांऐवजी आरोपींना पोलिसांची कोठडी मिळाली.