वैभव गायकर
पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील चारही आरोपीना न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे.या प्रकरणाची सुनावणी बुधवारी पनवेल सत्र न्यायालयात पार पडली. यावेळी आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजु पाटील,कुंदन भंडारी व महेश फणशीकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. आरोपींनी केलेले जामीन अर्ज न्यायमुर्ती माधुरी आनंद यांनी फेटाळले.
कोविड १९ अंतर्गत सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आधारे जामीन मिळावा म्हणुन आरोपींनी जामीन अर्ज केला होता.आरोपींच्या या मागणीला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी विरोध दर्शवला होता. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असुन या गुन्ह्यात फाशीची शिक्षा होवु शकते.या खटल्यातील मुख्य आरोपी कुरुंदकर हा पोलीस अधिकारी आहे.यातील दोन नंबरचा आरोपी राजकीय संबंधित आहे. त्यामुळे जर आरोपींना जामिनावर सोडले तर याचे परिणाम खटल्यावर होण्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील घरत यांनी केला होता.हे सर्व मुद्दे कोर्टाने गृहीत धरल्याने आरोपींना जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला. यापुढील सुनावणी हि व्हिडीओ कान्फरन्सद्वारे चालणार आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याकरिता अर्ज केला होता. या खटल्याची पुढील सुनावणी ११ जुन रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स ने चालणार आहे. या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यासमवेत एसीपी संगीत शिंदे अल्फान्सो, अश्विनी बिद्रेचे पती राजु गोरे आणि आरोपीचे वकील उपस्थित होते.