पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील ऊर्फ ज्ञानदेव पाटील, महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांनी उच्च-न्यायालयाच्या कोरोना गाईडलाईनप्रमाणे जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. या अर्जाला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. सोमवारी पनवेल सत्र न्यायालयात याबाबत युक्तिवाद करण्यात आला.अश्विनी बिद्रे हत्याकांडातील खटल्याची सध्या सुनावणी सुरू असून आतापर्यंत १२ साक्षीदार तपासले गेले आहेत. त्यामुळे जर आरोपींना जामीन दिला तर खटल्यावर विपरीत परिणाम होईल असा युक्तिवाद सरकारी वकील घरत यांनी केला. उच्च न्यायालयाच्या कोरोना गाईडलाईनप्रमाणेसुद्धा आरोपी जामिनासाठी पात्र नाहीत, कारण यांनी केलेला गुन्हा खूप गंभीर असल्याने या गुन्ह्याला फाशीची शिक्षा होऊ शकते असे मत वकील प्रदीप घरत यांनी मांडले. हा खटला हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चालवून साक्षीदार तपासले जावेत अशी मागणी गेल्या सुनावणीला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी लेखी स्वरूपात केली होती. यावर आरोपीच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खटल्याची सुनावणी घेण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले.न्यायमूर्ती माधुरी आनंद यांनी दोन्हीकडील म्हणणे ऐकल्यावर जामिनावर निर्णय पुढील सुनावणीदरम्यान घेण्यात येईल असे सांगितले. पुढील सुनावणी २ जून रोजी ठेवण्यात आली आहे .
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: सरकारी वकिलांचा आरोपींच्या जामिनाला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:12 AM