उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे खाजगी फायनान्स कंपनीच्या वैयक्तिक कर्ज विभाग प्रमुखावर कर्जदाराने कोयत्याच्या साहाय्याने मानेवरती वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उरुळी कांचन-जेजुरी रस्त्यावरील सौरभ कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात घडली. रवींद्र प्रकाश वळकुंडे ( वय २३, मुळ रा.अकलूज, जि. सोलापूर, सध्या रा.नक्षत्र सोसायटी,उरुळी कांचन) असे खून झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी राहुल लक्ष्मण गाढवे ( वय, २९ मूळ रा. देवळगाव ता. परांडा, जि. उस्मानाबाद, सध्या.रा.टायरपाटी, ता.दौंड) या आरोपीला हत्यारासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लोणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गाढवे या ट्रक ड्रायव्हर युवकाने खासगी फायनान्स कंपनीकडून ९८ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्या कर्जापोटी परतफेडीचा एक हप्ता भरला होता व दुसऱ्या हप्त्याच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीचे वैयक्तिक कर्ज विभागप्रमुख रवींद्र वळकुंडे यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता. त्याचा राग आल्याने दुपारी चारच्या दरम्यान राहुल गाढवे हा खाजगी फायनान्स कंपनीचे ऑफिसमध्ये गेला व त्याने वळकुंडे यांच्यावर धारदार कोयत्याच्या साहाय्याने सपासप वार केले. तातडीने अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने जखमी वळकुंडे यांना खाजगी रुग्णालयात हलवले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.