सौरभ खेकडेनागपूर : पतीने पत्नीला नोकरी करण्यास सांगणे कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही. या कृतीवरून पतीला पत्नीचे सशक्तीकरण व विकास करायचा असल्याचे दिसून येते. पतीने पत्नीला स्वत:च्या पायावर उभे होण्यास प्रेरित करणे चांगली बाब आहे, असे कुटुंब न्यायालयाने एका प्रकरणावरील निर्णयात नमूद केले.
दाम्पत्य नागपूर येथील रहिवासी असून, त्यांचे २०१५ मध्ये लग्न झाले. मतभेदामुळे ते काही वर्षांनंतर विभक्त झाले. पत्नीने कुटुंब न्यायालयात खावटीसाठी अर्ज दाखल केला. त्यात तिने पती नोकरी करण्यास सांगतो. सासू सकाळी घरकाम करायला लावते, असे आरोप केले होते. न्यायालयाला या आरोपांमध्ये गुणवत्ता आढळली नाही. पत्नी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्याचे व तिला चांगले वेतन मिळत असल्याचे रेकॉर्डवर आल्यामुळे तिला खावटीही नाकारण्यात आली.