आसाममधील धिंग सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी तफजुल इस्लामचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे चार वाजता पोलीस आरोपीला गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन जात होते. याच दरम्यान त्याने तलावात उडी मारून पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोन तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर आरोपीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४ वाजता तपास सुरू असताना इस्लाम याने घटनास्थळाजवळील तलावात उडी मारून पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो बुडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. दोन तासांनंतर बचाव पथकाने इस्लामचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे
कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारीच इस्लामला अटक केली होती. सामूहिक बलात्कारातील आरोपी म्हणून त्याची ओळख पटली. दुसरीकडे या कृत्यात सहभागी असलेल्या अन्य दोन गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. आरोपीच्या मृत्यूबाबत नागावचे एसपी स्वप्नील डेका म्हणाले की, "आरोपीची चौकशी करून त्याला गुन्ह्याच्या ठिकाणी नेल्यानंतर त्याने आमच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला."
"पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याने तलावात उडी मारली. आम्ही परिसराला वेढा घातला आणि तत्काळ एसडीआरएफला पाचारण केलं. शोध घेतल्यानंतर आम्हाला त्याचा मृतदेह सापडला आहे. आमचा एक पोलीस हवालदार यामध्ये जखमी झाला. आम्ही अद्याप दोन्ही आरोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करू."
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी अल्पवयीन मुलगी ट्यूशनवरून घरी परतत असताना धिंग परिसरात ही घटना घडली. वाटेत तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. रस्त्याच्या कडेला ही अल्पवयीन मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.