आसाममधील नागाव जिल्ह्यातील धिंग येथील सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला, त्यानंतर त्याने तलावात उडी मारली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली होती. तफजुल इस्लाम असं त्याचं नाव होतं. गुरुवारी ट्यूशनवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारात तो आरोपी होता. उर्वरित दोघे अद्याप फरार आहेत.
चौकशीअंती इस्लामला पहाटे चारच्या सुमारास घटनास्थळी नेण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला. त्याचवेळी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यासाठी त्याने तलावात उडी मारली. नागावचे एसपी स्वप्नील डेका यांनी सांगितलं की, आम्ही परिसराला घेराव घातला आणि राज्य आपत्ती निवारण दलाला पाचारण केलं. यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढला. यामध्ये एका पोलिसाच्या हातालाही दुखापत झाली आहे.
मुलगी आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होती. ती लहान असतानाच तिची आई वारली. तिच्या आजीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जेव्हा मुलगी दुसऱ्या गावातून ट्यूनशनवरून घरी परतली नाही तेव्हा तिला काळजी वाटू लागली. आठवड्यातून तीन वेळा दुपारी ट्यूशनसाठी जात असे. बहुतेक वेळा तिचे काका तिला त्यांच्या कारने सोडायचे आणि परत आणायचे.
घटना घडली त्यादिवशी मुलगी सायकलवरून ट्यूशनला गेली होती आणि संध्याकाळी सहापर्यंत घरी परतली नाही तेव्हा आजीने तिच्या मैत्रिणीला फोन केला. मैत्रिणीने सांगितलं की ती काही वेळापूर्वी येथून निघून गेली होती. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
मुलीचे वडील गुवाहाटीहून परतले. ते म्हणाले की, "मी तिला भेटलो तेव्हा तिला नीट बोलताही येत नव्हतं. आमच्या गावातील प्रत्येकजण घाबरलेला आहे. उर्वरित दोन आरोपींनाही लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. अन्यथा आपल्या मुलींच्या बाबतीत असेच काही घडू शकते या भीतीने लोक जगत राहतील."
आरोपीचं घर मुलीच्या घराला लागून असलेल्या गावात आहे. एवढेच नाही तर शनिवारी तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तणाव वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.