नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता आसाममध्ये घडली आहे. आसामच्या कछार जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला. मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी केली. तसेच त्यांनी निदर्शने करत परिसरात जाळपोळ केली. वाहनांना आग लावली.
मिळालेल्या माहितीनुसार, कछर जिल्ह्यातील सिलचर येथील आश्रम रोड परिसरात वास्तव्यास असलेली एक अल्पवयीन मुलगी रविवारपासून बेपत्ता होती. तिचा शोध सुरू होता. अखेर बुधवारी पीडितेचा मृतदेह सिलचरच्या मधुरा घाट येथे आढळला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेच्या या अवस्थेमागे रोनी दास नावाच्या व्यक्तीचा हात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला. रोनी दास यानेच पीडितेचं अपहरण करुन बलात्कार आणि हत्या केली, असा आरोप स्थानिक लोकांनी केला.
रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी जाळून टाकल्या
पीडितेचा मृतदेह सापडल्यानंतर लोकांना संताप अनावर झाला होता. त्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रचंड गर्दी जमली. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. गर्दीतील काहींनी घोषणाबाजी करताना रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी जाळून टाकल्या. गाड्यांना आग लावली. तसेच त्यांनी सुरक्षाकर्मींवर दगडफेक केली. आरोपी रोनी दासच्या नातेवाईकांच्या दुकानांना आग लावण्यात आली. अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. अखेर या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार सुरू केला.
गर्दीतील अनेक लोक दारुच्या नशेत होते
पोलिसांनी हवेत गोळीबार करण्याआधी आंदोलनकर्त्यांना विनंती केली होती. आरोपींना अटक करण्यात आल्याचं सांगितलं होतं. पण आंदोलक तरीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी अनेकांनी दुकानं लुटून हात साफ करुन घेतला. गर्दीतील अनेक लोक दारुच्या नशेत होते. दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी या गदारोळाचं समर्थन केलेलं नाही. संबंधित भूमिका ही आपली भूमिका नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी 147 सीआरपीएफ जवान, फायर ब्रिगेडच्या गाड्या तैनात करण्यात आल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.