काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या; गड्डीगोदाममधील घटना, आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 02:40 PM2020-08-16T14:40:02+5:302020-08-16T14:40:08+5:30
परिसरात तणाव, आरोपी फरार
नागपूर : नागपुरात गेल्या बारा तासात हत्येच्या दोन घटना घडल्या मृतांमध्ये एका माजी नगरसेवकाचाही समावेश आहे.
सदर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनांमुळे त्या त्या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गड्डीगोदाम परिसरात माजी नगरसेवक देवा उसरे यांची दोन आरोपीने रविवारी भल्या सकाळी निर्घुण हत्या केली.
गेल्या टर्ममध्ये उसरे काँग्रेसचे नगरसेवक होते. तीन वेळा ते महापालिकेत निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत ते महापालिकेत निवडून येऊ शकले नाही. मात्र परिसरातील नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी ते रोज सकाळी आपल्या प्रभागात फिरत होते. नेहमीप्रमाणे रविवारी भल्या सकाळी उठून ते आपल्या बुलेटने परिसरात फिरले आणि ७.३० वाजताच्या सुमारास नेहमीच्या चहाच्या टपरीवर चहा घ्यायला आले. बुलेटवरून उतरत असतानाच तोंडाला मास्क आणि स्कार्फ बांधून आलेल्या दोन पैकी एका आरोपीने त्यांच्या पाठीत चाकू भोसकला.
बचावासाठी उसरे यांनी दोन्ही आरोपींचे केस पकडून त्यांचा प्रतिकार केला. तेवढ्यात दुसरा आरोपीने त्यांच्यावर डोक्यावर कुर्हाड मारली. ते खाली पडल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर चाकू आणि कुर्हाडीचे घाव घालून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. त्यांची हालचाल थांबल्यानंतर शिवीगाळ करत आरोपी पळून गेले. वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. उसरे यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी त्यांना मेयो इस्पितळात नेले. तेथे डॉक्टरांनी उसरे यांना मृत घोषित केले. दरम्यान, ही माहिती कळताच आमदार विकास ठाकरे तसेच काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येत इस्पितळात पोहोचले.
मालमत्तेच्या कब्जावरून वाद
उसरे यांची हत्या मालमत्तेच्या कब्जावरून झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, उसरे यांच्या मालकीच्या घरात आरोपी भाड्याने राहत होते. घर खाली करण्याच्या विषयावरून आरोपी आणि उसरे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. त्याच्या पोलिसांकडे तक्रारीही झाल्या होत्या. शेवटी या वादात उसरे यांचा बळी गेला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीचा छडा लागला नव्हता. मृत उसरे यांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. पोलीस त्यासंबंधाने ही अहवाल शोधत आहेत.
हत्येची दुसरी घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली. जुन्या वादातून चेतन किशोर मेटांगळे (वय २७, रा. मानेवाडा रिंग रोड) याला आरोपी बादल नेताम, निलेश गेडाम, रोशन धुर्वे आणि अश्विन नामक आरोपींनी धारदार शस्त्राने भोसकून ठार मारले. उदयनगर गार्डन जवळ ही घटना घडली. गाडीच्या पार्किंगच्या वादातून ही हत्या घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, अवैध दारूच्या धंद्यावरून निर्माण झालेल्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. सचिन किशोर मेटांगळे (वय २९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपी नेताम, गेडाम आणि धुर्वे या तिघांना अटक करण्यात आली. चौथा आरोपी फरार आहे.