मीरारोड - भाईंदरमध्ये दवाखान्यात एकट्या बसलेल्या महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करून चैन आदी ऐवज लुटून नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. भाईंदर पश्चिमेस नारायणा शाळेजवळ डॉ. गायत्री जयस्वाल यांचा दवाखाना आहे. त्या नेहमीप्रमाणे दवाखान्यात बसलेल्या होत्या. दुपारी मास्क घातलेला एकजण दवाखान्यात शिरला. काही मिनिटांनी एक दाम्पत्य उपचारासाठी आल्याने ती व्यक्ती पुन्हा काही मिनिटांसाठी बाहेर आली. दाम्पत्य गेल्यावर पुन्हा आत जाऊन काही मिनीटाने बाहेर उभ्या केलेल्या दुचाकीवरून पळून गेली.
आतमध्ये असताना त्या व्यक्तीने रक्तदाब तपासायच्या यंत्राने त्यांच्या डोक्यावर अनेकवेळा घाव घातले. गायत्री यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या व त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. हल्लेखोराने डॉ. गायत्री यांची सोन्याची चैन आदी ऐवज लुटून नेला. महिला डॉक्टरवर झालेल्या ह्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. डॉ. गायत्री यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांच्या डोक्याला सुमारे ३५ ते ४० टाके पडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटजे सापडले असले तरी हल्लेखोराने मास्क घातलेले असल्याने त्याची ओळख पटवण्यासह शोध घेणे सुरु आहे. शहरात एखाद्या डॉक्टरवर त्याच्या दवाखान्यात शिरून असा प्राणघातक हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या विविध संघटनानी सदर घटनेचा निषेध करत हल्लेखोरांना लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे. सदर हल्ला लुटण्यासाठी वा अन्य कारणासाठी झालाय का? अशी दोन्ही बाजूची शक्यता पोलीस पडताळून पाहत आहेत . भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्या व्यक्तीची दवाखान्यातून ये-जा सापडली आहे.