नेरळ : कर्जत तालुक्यातील दुसरी मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयातच प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंच महेश विरले हे गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्यानेच हा हल्ला केला आहे.
महेश विरले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरपंच विरले यांच्यासह इतर दोघांना मारहाण झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालयात ३१ मे रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, मात्र कोरमअभावी ती तहकूब करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यानेच सरपंच विरले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
असे घडले...ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे हे रस्त्याच्या बांधकामाला ग्रामपंचायतीने नोटीस काढल्याच्या राग धरून सरपंच महेश विरले यांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊ लागले. विरले यांनी याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या दालनामध्ये काम करत बसले. त्यामुळे विजय हजारे, दिव्यासू चंद्रकांत हजारे, चंद्रकांत हजारे व रामचंद्र हजारे हे तिथे दाखल झाले. विजय हजारे यांनी हातात दांडका घेऊन महेश विरले यांच्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली.सरपंच महेश यांच्यावर जोरदार प्रहार केले. दिव्यासु हजारे यांनी देखील विरले यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. दरम्यान, तंटामुक्ती अध्यक्ष पपेश विरले व सोमनाथ विरले हे भांडण सोडविण्यास गेले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली.