योगेश पांडे
नागपूर : महिन्याभरापूर्वी झालेल्या वादातून झापड मारल्याचा बदला घेण्यासाठी दोन आरोपींनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून दोन्ही आरोपी फरार आहेत.
मिनीमाता नगर येथील पाच झोपडा येथील निवासी असलेले अविनाश टंडन व सन्नी चंदेल अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचा महिन्याभराअगोदर हितेश रमेश डांगे (२३, मिनीमाता नगर, कळमना) याच्याशी वाद झाला होता. या वादातून हितेशने अविनाशला झापड मारली होती. तेव्हापासूनच अविनाश व सन्नी बदला घेण्याचा कट रचत होती. शनिवारी दुपारच्या सुमारास आरोपींनी हितेशला गाठले व वाद उकरून काढला. हितेशला काही कळायच्या आतच त्यांनी त्याच्या मांडीसह, हातावर तसेच पोटावर गुप्तीने वार केले. यात हितेश रक्तबंबाळ झाला. त्याला जखमी अवस्थेत मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. हितेशच्या आईच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.