अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगरातील एका युवकावर रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळेच्या इशाऱ्यावरून सहा ते सात जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वाशिम बायपासमधील पंचशीलनगर येथील रहिवासी अमोल रुस्तुम जोगदंड, वय २९ वर्षे हा युवक शुक्रवारी सायंकाळी घरी असताना रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन काशीनाथ कांबळे याच्या इशाऱ्यावरून कुमाऱ्या ऊर्फ आशिष पालकर, सतीश चक्रनारायण, अक्षय पालकर, हर्षदीप कांबळे, नागेश पालकर, जितू पालकर यांनी अमोलच्या घरी जाऊन त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. यामध्ये आरोपींनी अमोलच्या पोटात तीन वेळा चाकू भोसकल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला आहे. अमोल जोगदंड यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर आरोपींचा शोध सुरू केला. सातही आरोपी फरार झाले आहेत. जुने शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अमोल जोगदंड यांच्या तक्रारीवरून या सात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, १४७, १४८, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १०९ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार महेंद्र देशमुख करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी झाली होती हद्दपारी
रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन काशीनाथ कांबळे यांची काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आली होती. मात्र, त्यावर स्थगिती मिळविल्याची माहिती आहे. त्यानंतर आता आणखी एका प्राणघातक हल्ल्यात गजानन कांबळे यांचा सहभाग असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी दिली.