लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तब्बल २०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात गुंतलेला व दाऊदचा हस्तक मानल्या जाणाऱ्या असगर अली शेराजी व त्याच्या साथीदारांची एकूण ५ कोटी ३७ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) शुक्रवारी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेत फ्लॅट, दुकाने, भूखंड अशा एकूण सात मालमत्तांचा समावेश आहे. याखेरीज विविध बँक खात्यांमध्ये असलेली ३६ लाख ८१ हजार रुपयांची मुदत ठेवही जप्त करण्यात आली आहे.
शेराजी याने मुंबई, भारतासह अनेक देशांत २०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याने प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, यूके आणि युरोपातील काही देशांत अमली पदार्थ पाठवले होते. तो दुबई येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई पोलिसांनी त्याला गेल्यावर्षी मे महिन्यात अटक केली होती. त्याच्याविरोधात मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत.
अमली पदार्थांच्या तस्करीद्वारे मिळालेला पैसा त्याने पदेशातून फिरवून परत भारतात आणल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सर्वप्रथम मुंबईतील जोगेश्वरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.
ईडीने आजवर केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेराजी व त्याच्या साथीदारांनी परदेशात अमली पदार्थ पाठविण्याची माहिती मिळावी, याकरिता कॉल सेंटर तयार केले होते.
परदेशातून या कॉल सेंटरवर त्यांना ऑर्डर मिळत असे. ऑर्डर परदेशात पाठविण्यासाठी त्याने भारतात बनावट औषधनिर्मिती कंपन्या उभ्या केल्या.