- सदानंद नाईकउल्हासनगर : बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ५० हजाराच्या लाचेची मागणी करणारे सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्यासह दोन जणांना २० हजाराची लाच घेतांना होळीच्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती क्रं-१ चे सहायक आयुक्त अजित गोवारी, प्रभारी मुकादम प्रकाश राजु संकत, कंत्राटी चालक प्रदीप निवृत्ती उमप यांनी बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एका बांधकामधारकाकडे ५० हजाराची मागणी केली होती. सदर बांधकामधारकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाचेची मागणी करीत असल्याबाबतची तक्रार ३ मार्चला केल्यावर, तकारीची पडताडणी करून ६ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्यासाठी प्रभारी मुकादम प्रकाश संकत यांला लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. संकत यांनी लाचेची रक्कम स्विकारून कंत्राटी चालक प्रदीप निवृत्ती उमाप यांच्याकडे गोवारी यांना देण्यासाठीं दिली. अशी विभागाला कबुली दिली.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक आयुक्त अजित गोवारी, प्रभारी मुकादम प्रकाश संकत व कंत्राटी चालक प्रदीप उमप यांना अटक करून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्यां पथकाने ही कारवाई केली. दोन महिन्यांपूर्वी प्रभाग समिती क्रं-३ चे मुकादम व कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. यापूर्वी प्रभाग क्रं-२ व ४ चे सहायक आयुक्त, प्रभारी मुकादम व कर्मचारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना अटक केली होती. या प्रकाराने महापालिकेचे लक्तरे वेशीवर टांगले असून आयुक्त अजीज शेख काय नकारवाई करतात, याकडे सर्वांचें लक्ष लागले आहे.