कसबा तारळे येथे सख्या धाकट्या भावाचा चार दिवसांपूर्वी थोरल्या भावाने जमीनीची वाटणी मागतो व दारू पितो म्हणून खून केल्याची घटना रविवार (दि.३)उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली.
प्रकाश विठ्ठल पाटील (वय ३८) असे मयताचे नाव असून पोलिसांनी आज रात्री संशयीत आरोपी धोंडीराम विठ्ठल पाटील (वय ४४) याला अटक केली. याबाबत घटना स्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : धोंडीरामच्या पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली स्वत: धोंडीराम व मयत भाऊ प्रकाश यांना शिक्षा झाली होती. शिक्षा संपल्यानंतर ते गावी आले व पुढे रोजगारासाठी कागल येथे राहात होते. दरम्यान वडील व आईचे निधन झाल्याने हे कुटुंब उध्वस्त झाले. गेल्या ३० जून रोजी शेतीचे पैसे येथील बँकेतून दोघा भावांनी घेतले व येथील घरातच दोघांनी मुक्काम केला.
त्या रात्री धोंडीरामने प्रकाश दारू पितो व शेतीची वाटणी मागतो म्हणून लाकडी ओंडक्याने मारून खून केला. शेजारी असलेल्या चुलतभावाला काल संशय आल्याने व दुर्गंधी जाणवू लागल्याने त्यांनी याची माहिती राधानगरी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर त्यांना घरात प्रेत दिसले मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने आणि सडू लागल्याने प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सी.पी.आर.इस्पितळात नेले व नंतर ते अंत्यविधीसाठी जवळच्या नातेवाईकांकडे सोपविले. आज रात्री पोलिसांनी धोंडीरामला अटक केली.
एका गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्यानंतर व आई वडीलांच्या निधनानंतर येथील घराला कुलूप लावून हे दोघेही कागल येथे राहात होते. या दोघानांही दारूचे व्यसन असल्याचे समजते. ३० जून रोजी हे दोघेही शेतीच्या पैशासाठी येथे आले होते. त्या रात्रीच जमिनीच्या वाटणीचे कारण पुढे करीत प्रकाशचा लाकडी ओंडक्याचे घाव घालून धोंडीरामने खून केला.परंतू हा खूनही धोंडीरामने दारूच्या नशेतच केल्याची चर्चा आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंह घाटगे करीत आहेत.