शिरपूर (जि.धुळे) : देशी बनावटी पिस्टल काडतुससह घेवून जाणाऱ्या २ युवकांना शिरपूर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दुचाकी गाडीसह पिस्टल, काडतुस, मोबाईल असा एकूण ८७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमवार १० एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मुबंई-आग्रा महामार्गावरील शिरपूरजवळील हॉटेल गॅलेक्झीसमोर ही कारवाई करण्यात आली.
शिरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना गुप्त बातमीदाराने २ इसम दुचाकी गाडीने शिरपूर फाट्याकडून धुळ्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व काडतुस घेवून जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक आगरकर यांनी लागलीच पोलिस उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, पोउनि गणेश कुटे यांच्यासह डीबी पथकाने टोलनाकाजवळ सापळा रचला़ काहीवेळाने शिरपूरकडून २ युवक दुचाकी गाडी क्रमांक एम़एच़-२०-एफएन-५१९३ ने येत असल्याचे दिसतात पोलिसांनी त्यांची चौकशी केली. सुरूवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिलीत. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता विना परवाना देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे, मोबाईल मिळून आले. २५ हजाराची पिस्टल, १ हजाराचे काडतुस, ५० हजाराची दुचाकी गाडी व ११ हजाराचे २ मोबााईल असे एकूण ८७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पोकॉ प्रशांत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अरबाज इस्माइल शेख (२१) व शाबीर शहा सगीर शहा (१९,दोन्ही राहणार अंबिकानगर शिरपूर) यांच्या विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदवून त्या दोघांना जेरबंद करण्यात आले़ पुढील तपास पोउनि गणेश कुटे हे करीत आहेत.