धुळे : इंडिया कंपनीचे एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांनी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. यात पैसे सुरक्षित असून मशीनचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ही घटना साक्री तालुक्यातील दहिवेल येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल झाला. इंडिया कंपनीच्या एटीएम मशीनमध्ये पैसे लोड करणारे कर्मचारी दीपक उत्तम पवार (रा. पिंपळनेर ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, साक्री तालुक्यातील दहिवेल येथे इंडिया कंपनीचे एटीएम मशीन नागरिकांच्या सोईसाठी बसविण्यात आलेले आहे.
नियमितपणे या एटीएम मशीनमध्ये पैसे भरणे आणि कार्डद्वारे काढण्याचे काम सुरू हाेते. अचानकपणे शनिवारी पहाटे ३ वाजेपासून मशीन बंद येत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळाले. त्यामुळे कंपनीच्या एटीएम मशीनमध्ये कॅश लोडिंग करणारे कर्मचारी दीपक पवार यांनी जाऊन तपासणी केली असता मशीन फोडलेल्या अवस्थेत दिसून आले. मशीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी मशीनमधील रोख रक्कम मात्र सुदैवाने सुरक्षित राहिलेली आहे.
घटनेची माहिती साक्री पेालिसांना कळविताच पोलिस दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. चौकशी आणि काही पुरावे मिळतात का याची तपासणी पोलिसांनी केली. कंपनीच्या आदेशानंतर कर्मचारी दीपक पवार यांनी सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भादंवि कलम ४५७, ३८०, ४२७, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक पी. डी. रौंदळ करीत आहेत.