मुंबई : पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनमध्ये स्वाइप केलेले कार्ड अडकले, ते काढण्याचा बराच वेळ प्रयत्न करूनही न निघाल्याने एका तरुणाने मशीनचीच तोडफोड केल्याचा प्रकार कांदिवलीत घडला. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.
कांदिवली पूर्वच्या सेंट्रीअम मॉलमध्ये एक इसम अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडत आहे, असा मेसेज पोलीस नियंत्रण कक्षाकडून समतानगर पोलिसांना मिळाला. त्यानुसार समतानगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुळे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले.तेव्हा तेथे त्यांना अॅक्सिस बँकेचे एटीएममधील मशीन डिस्प्ले स्क्रीन उचकटून व वायरिंग व इलेक्ट्रिक साधनाचे नुकसान करून चोरीचा प्रयत्न झाल्याचे आढळले.
मात्र आजूबाजूला कोणी संशयित व्यक्ती दिसली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा फोन करणाऱ्याला संपर्क साधून आरोपीविषयी व त्याने वापरलेल्या मोटारसायकल संदर्भात वर्णन विचारले. तेव्हा तो क्रांतीनगर रिक्षा स्टॅण्डजवळ स्कूटी पार्क करून झोपडपट्टीत पळून गेल्याचे त्यांना समजले. त्यानुसार पोलिसांनी शिताफीने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत संजय बलीहरिप्रसाद कुमार (२६) असे आरोपीचे नाव असून तो मार्वे रोड परिसरात राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली असून त्याच्यावर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू कसबे यांनी सांगितले.