मुंबई - अंधेरीतील एटीएम सेंटरमध्ये एटीएम मशीन हँग करून एटीएमधारकांना गंडा घालणाऱ्या आकाश भोसले या आरोपीला अंधेरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे अटक केली आहे. आतापर्यंत ही शक्कल वापरून आकाशने १० ते १५ ग्राहकांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. अंधेरीतील एटीएममधून अनेकांची फसवणूक केल्यानंतर अंधेरी पोलीस या आरोपीच्या मागावर होते. पोलिसांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आणि त्यानंतर आरोपी आकाशला अटक करण्यात आली आहे.
दोन एटीएम असलेली एटीएम सेंटर आकाश निवडायचा. त्यानंतर काही बटणं दाबून आकाश एक मशींन हॅंग करतो आणि त्यानंतर दुसऱ्या मशीनजवळ थांबतो. हॅंग झालेल्या मशीनजवळ ग्राहक येतो आपलं कार्ड टाकतो आणि पैस काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ती मशीन हॅंग झालेली असते. त्यावेळी शेजारी उभा असलेला आकाश त्याला दुसऱ्या एटीएमकडे पाठवतो. खातेदार पिन क्रमांक टाकून आपले पैसे काढत असताना आकाश त्याचा पासवर्ड बघतो आणि चार अंकी पिन क्रमांक लक्षात ठेवतो. नंतर हा ग्राहक जाताच आकाश हॅंग झालेल्या मशीनला परत व्यवस्थित करतो आणि त्या एटीएम मशीनमध्ये त्या ग्राहकाच्या कार्डची एंट्री आधीच झालेली असते. त्यामुळे पुन्हा एटीएम कार्ड इन्सर्ट करण्याची गरज नसते हँग केलेल्या मशीनमध्ये आकाश पासवर्ड टाकतो आणि पैसे काढून पसार होतो. अशी होती आरोपी आकाशाची मोडस ऑपरेंडी. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या एटीएम मशीनला कार्ड क्लोनिंग करून पैसे लुबाडले जात होते. आता आरोपी आकाशची ही शक्कल ऐकून बॅंकेचे अधिकारी देखील थक्क झाले आहेत. यु ट्युबवर बघून आपण हे शिकल्याच आकाशने पोलिसांना सांगितलं आहे.
पहा! आरोपी कसा लावायचा ग्राहकांना चुना