तुम्ही कधी एटीएममधून पैसे काढून बँकेकडे रिफंड मिळण्यासाठी तक्रार केली आहे का? असे झालेच तर तुम्हाला कधी पैसे परत बँकेने दिलेत का? नाही ना. तुम्ही म्हणाल की असे कधी होईल का? दिल्ली पोलीस म्हणतात असे होते. एक व्यक्ती दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे, जो एटीएममधून पैसे काढत होता आणि बँकेकडूनही पैसे आले नाहीत असे सांगून रिफंड मिळवत होता. अशाप्रकारे त्याने अनेक बँकांना चुना लावला आहे.
अझरुद्दीन नावाच्या या तरुणाने बँकांना फसविले आहे. हरियाणाच्या मेवातमध्ये राहणाऱ्या अझरुद्दीनने एटीएममधील ही त्रूटी शोधली आणि त्याचा फायदा उठविला. आरोपीने आतापर्यंत लाखो रुपयांचा चुना लावला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 17 एटीएम जप्त केले आहेत.
आरोपी अझरुद्दीन एटीएम मशीनमध्ये डेबिट कार्ड घालत होता, मशीनमधून पैसे बाहेर येत असताना तो ते पैसे तसेच अडकवून ठेवायचा. म्हणजे बाहेरच येऊ देत नव्हता. यानंतर मशीन एरर दाखवायची. हा एरर दिसताच तो ते पैसे पटकन काढून घ्यायचा. अशाप्रकारे एटीएममधून आलेले पैसे खिशात घालून तो बँकेत जायचा आणि पैसे न आल्याची तक्रार करायचा.
बँकेकडे तक्रार झाल्यावर बँक त्याला पैसे रिफंड करायची. एकदा एका बँकेला संशय आल्याने त्यांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना कव्हर उघडले नाही, असा एरर दिसला. यामुळे अझरुद्दीनला पैसे परत करावे लागले होते. दिल्ली पोलिसांकडे एका राष्ट्रीय बँकेने एरर दाखवून अनेकदा पैसे रिफंड केले गेले, अशी तक्रार केली. यानंतर पोलिसांनी अझरुद्दीनच्या मुसक्या आवळल्या.