जानेफळ: मेहकर तालुक्यातील बाऱ्डा येथे एका भीक्षेकरी महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जानेफळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, आरोपीच्या शोधात जानेफळ पोलिसांचे एक पथकही रवाना करण्यात आले आहे.
जानेफळ परिसरातील एका गावात एक भीक्षेकरी महिला गेल्या काही वर्षापासून वास्तव्यास आहे. दरम्यान ही महिला नजीकच्या बाऱ्डा गावात गुरूवारी भीक्षा मागण्यासाठी गेली होती. दुपारी एक ते दोनच्या सुमारास ती या गावात पोहोचली होती. त्यावेळी बळीराम शिवराम बाऱ्डेकर याने भीक्षा देण्याच्या बहाण्याने तिला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या भीक्षेकरी महिलने आरडाओरड करत घराबाहेर पळ काढला. तिच्या आवाजाने आजूबाजूच्या महिला तेथे पोहोचल्या तेव्हा पीडित महिलेने तिच्यावर बेतलेला प्रसंग कथन केला. सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम आहे. त्यामुळे गावात वृद्धांव्यतिरिक्त फारसे अन्य व्यक्ती नसतात. नेमका याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने भीक्षेकरी महिलेवर अत्याचार केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पीडिता ज्या गावात राहते तेथील ग्रामस्थांनाही काहींनी दिली. त्यामुळे तेथील ४० ते ५० ग्रामस्थांनी रात्री उशिरा जानेफळ पोलिस स्टेशन गाठले असून तेथे बळीराम बाऱ्डेकर विरोधात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी जानेफळ पोलिसांचे एक पथक पाठविण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार दिलीप मसराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.