मुंबई - बनावट भारतीय पासपोर्ट तयार करून परदेशात फिरलेल्या बांगलादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) दिल्ली विमातळावरून अटक केली. इर्शाद शहाबुद्दीन शेख (३३) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला शनिवारी मुंबईत आणून न्यायालयापुढे हजर केले. त्यावेळी त्याला न्यायालयाने ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी शेख शाहजाह येथून दिल्लीला येणार असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली. त्यानुसार पहिल्या विमानाने मुंबईहून एटीएसचे पथक दिल्लीला रवाना झालं. त्यानंतर शेखला दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एटीएसने ताब्यात घेतले.
शेख हा बांगलादेशातील नोहखली जिल्ह्यातील कबीर हट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालीपोडा गावातील कलामुन्शी बाजार येथील रहिवासी आहे. त्याने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने भारतीय पासपोर्ट तयार केला. आरोपीला आज मुंबईत आणून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. शेख या आरोपीला बनावट कागदपत्र बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांचा शोध एटीएसकडून सुरू आहे. त्याचप्रमाणे आरोपीच्या परदेशातील ट्रिपमागे काय कारणं आहेत याची एटीएस चौकशी करत आहे. तसेच त्याला बनावट पासपोर्ट बनवून देणाऱ्याची देखील पाळंमुळं शोधून काढली जात आहेत.