मुंबई : बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपीला ७ वर्षाने अटक केली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये त्याला बेडया ठोकल्या आहेत. यात, अताऊर अयुब अली रेहमान (२८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नाव आहे.
एटीएसने बनावट नोटांंप्रकरणी १२ एप्रिल २०१४ रोजी ७ आरोपीना अटक करत त्यांच्याकड़ून ५ लाख १७ हजार बनावट नोटा जप्त केल्या होत्या. अटक आरोपींविरोधात दोषारोप पत्र देखील दाखल करण्यात आले आहे. यातच रेहमान हा मुख्य आरोपी असल्याचे तपासात समोर आले. एटीएसने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात देखील रेहमानचा पाहिजे आरोपी म्हणून उल्लेख होता.
गेल्या सात वर्षापासून पथक त्याचा शोध घेत होते. अनेकदा पथक आरोपीच्या शोधासाठी पश्चिम बंगालमध्ये जावून आले. मात्र रेहमान त्यांच्या हाती लागला नाही. अखेर पुन्हा त्याचे पश्चिम बंगाल मधील लोकेशन समजताच पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याने बांग्लादेश मधून बनावट नोटा मिळवल्या होत्या. याच नोटा अटक आरोपीकड़े बाजारात वितरीत करण्यासाठी दिल्या असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी रेहमान कड़े अधिक तपास सुरु आहे.