मुंबई : पाकिस्तान स्थित आयएसआय या गुप्तहेर संघटनेस भारतीय बनावटीच्या विमानाची माहिती पुरविणाऱ्या हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्याला एटीएसने अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथक(एटीएस), नाशिक युनिट येथे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली की, एक इसम परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्याच्याशी संबंधीत संवेदनशील माहिती तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती परदेशी व्यक्ती पुरवत आहे. त्यानंतर या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक एटीएसने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दीपक शिरसाठ (४१) असं या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीवरून सखोल चौकशी केली असता असे निदर्शनास आले की, ओझर, नाशिक स्थित भारतीय बनावटीची विमाने बनविणाऱ्या "हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड" या कंपनीमधील एक कर्मचारी आरोपी हा पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानाच्या संवेदनशील तांत्रिक तपशिलाची, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या नाशिक येथील विमान कारखान्याची, सदर कारखाना परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची तसेच ट्रे गोपनीय माहिती पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संघटनेस पुरवत होता. त्यावरून त्याच्या विरुद्ध कलम ३, ४, आणि ५ शासकीय गुपिते अधिनियम १९२३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून 3 मोबाइल हँडसेट, ५ सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहे. सदर साहित्य विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथे पाठवण्यात आले आहेत.आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
पाकिस्तान गुप्तहेराशी संपर्कात राहत भारतीय लढाऊ विमानांची तांत्रिक माहिती गोपनीय पद्धतीने पुरविल्याल्याबद्दल कर्मचारी दीपक शिरसाठला अटक झाली हे कळले. दहशतवाद विरोधी पथक कारखान्याला काही वेळात भेट देत असून त्यांना सर्व सहकार्य केले जाईल.एचएएलच्या कायद्याच्या आधारे देखील दोषी आरोपीवर कारवाही करण्यात येईल.अनिल वैद्य, उप-महाप्रबंधक, मानव संसाधन विभाग नाशिक