लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) कार्यरत असलेल्या उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. मायकेल वेस्ट नावाच्या परदेशी नागरिकाने हे कृत्य केले असून, त्यामागील त्याचा हेतू स्पष्ट झालेला नाही.
याबाबत लांडे यांनी फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे (सीईओ) तक्रार केली आहे. बिहार केडरमधील डॅशिंग अधिकारी व मराठा सिंघम म्हणून ओळखले जाणारे शिवदीप गेल्या साडेचार वर्षांपासून महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. सोशल मीडियावर ते ॲक्टिव्ह असून, युवकांना प्रेरणादायक व महत्त्वपूर्ण बाबी पोस्ट करत असतात. त्यामुळे त्यांच्या फेसबुक पेजचे साडेसात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
मनजित विशाल हे या पेजचे ॲडमिन होते. मात्र १९ ऑगस्टपासून पेज हॅक करून त्यांना बेकायदेशीरपणे हटविण्यात आले आहे. त्यावर परस्पर पोस्ट टाकल्या जात आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिवदीप लांडे यांनी तातडीने फेसबुकच्या सीईओंकडे इ-मेलद्वारे तक्रार केली आहे. पेजवरील सर्व डाटा सुरक्षित ठेवण्यात यावा, असे कळवले आहे. परदेशी नागरिक मायकेल वेस्ट नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
माझे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या त्यावर देण्यात येत असलेल्या पोस्ट, फोटोंशी माझा संबंध नाही. या प्रकाराबाबत फेसबुकच्या सीईओंकडे तक्रार केली आहे. लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहोत.- शिवदीप लांडे, उपमहानिरीक्षक, एटीएस, महाराष्ट्र