मुंबई : धारावीतून जान मोहम्मद अली शेख उर्फ समीर कालियाच्या अटकेनंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून ज़ाकिर हुसेन शेखला बेडया ठोकल्या. शेखपाठोपाठ एटीएसनेमुंब्रा येथून रिझवान इब्राहीम मोमीन (४०) याला रविवारी ताब्यात घेत अधिक चौकशी सुरु केली आहे.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, अन्थोंनी उर्फ अन्वर उर्फ अनस आणि शेख विरोधात बेकायदेशीर कृत्य करण्याचा कट आखण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १७ तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापाठोपाठ शेख विरोधात लुक आउट नोटीस जारी करत त्याला १८ तारखेला अटक केली. शेख हा अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. शेखचा भाऊ शाकीर शेख हा पाकिस्तानमध्ये असून तो दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम याचा खास हस्तक आहे. शाकीरच्या माध्यमातून शेख हा अनिस इब्राहिमच्या सातत्याने संपर्कात होता. त्यामुळे तो मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्याही रडारवर तो सुरुवातीपासूनच होता. गुन्हे शाखेने एका प्रकरणात शेखला यापूर्वी अटक केली होती. अनिस इब्राहिमच्या सांगण्यावरुनच शेख याने जान मोहम्मदला या दहशतवादी हल्ल्याच्या योजनेमध्ये सामिल केले होते. त्यामुळे शेख हा अंडरवर्ल्डमधील स्लीपर सेल पद्धतीने काम करत असून जान मोहम्मदला तो लॉजिस्टिक सपोर्ट देत असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. तसेच, शेखच्या सांगण्यावरुनच जान मोहम्मद दिल्लीसाठी रवाना झाला होता, अशी माहिती मिळते आहे. सोमवारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावली आहे. शेख पाठोपाठ या गुह्यांत मोमीनचा सहभाग समोर येताच, पथकाने रविवारी मुंब्रा येथून त्याला ताब्यात घेतले आहेत. त्याच्या घरातूनही महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जप्त केल्याचे एटीएसकड़ून सांगण्यात आले. शेखने मोमीनकड़े दिलेल्या मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी मोमीनने तो तोडून जवळच्या नाल्यात फेकला. रविवारी अथक प्रयत्नाने नाल्यातून ३ तुकडयांंमध्ये मोबाईलचा शोध घेण्यास यश आले आहे. मोमीन हा मुंब्राच्या चांदनगर येथील नुरी सोसायटीत भाड्याच्या घरात राहायचा. त्याने खाजगी शिकवणी सुरू केले होते. याआधी तो मुंबईत शिक्षक म्हणून काम करायचा अशी माहिती मिळत आहे. त्याच्याकड़े याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.