लखनऊ - पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला (आयएसआय) गुप्त माहिती देणाऱ्या बीएसएफच्या (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) जवानाला उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. अच्युतानंद मिश्रा असे अटक जवानाचे नाव आहे. आयएसआयच्या एका महिला एजंटने मिश्राला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून गुप्त माहिती मिळवली आणि आयएसआयला पुरवल्याचे एटीएसने सांगितले.
एटीएसच्या पथकाने मिश्राला नोएडाच्या सेक्टर १८ मधून आज अटक केल्याचे उत्तर प्रदेशचे डीजीपी ओमप्रकाश सिंह यांनी सांगितले. देशातील गुप्त आणि संवेदनशील माहिती आयएसआयला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. देशातील संवेदनशील ठिकाणे, अंतर्गत सूचना, बीएसएफ आणि लष्कराच्या प्रशिक्षण संस्था याबाबतची माहिती आयएसआय़ला दिल्याचे मिश्रा यांनी चौकशीत कबूल केले आहे. पाकिस्तानी हेर महिलेशी फेसबुकवरून ओळख झाल्याचे मिश्रा यांनी सांगितले. मिश्रा यांनी बीएसएफचे अनेक महत्वापूर्ण दस्तावेजही महिलेला दिल्याचे उघड झाले आहे. मिश्रा यांच्या बँक खात्याचीही माहिती मिळवण्यात येत आहे. आयएसआय़ला माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्यांना किती पैसे मिळाले याची चौकशी करण्यात येत आहे. मिश्राच्याविरोधात देशद्रोह आणि संवेदनशील, गुप्त माहिती उघड केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी पुढे सांगितले.