लखनऊ: घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत माहिती मिळताच एटीएसने लखनऊचा काकोरी परिसराला सील ठोकले आहे. एटीएसला घराच्या आत लावलेल्या प्रेशर कुकर बॉम्बची माहिती मिळाली असल्याने बॉम्ब पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. याची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी एटीएसने हा परिसर सील केला असून कोणालाही निर्बंधित परिसरात जाऊ दिले जात नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून जवळपासची घरेही रिकामी करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
एटीएसने दहशतवाद्यांकडून काही प्रमाणात स्फोटकेही जप्त केली असून अटक केलेले दहशतवादी जम्मू स्फोटात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एटीएसने अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. असे म्हटले जात आहे की, या दहशतवाद्यांचे हँडलर पाकिस्तानातील आहेत.या दहशतवाद्यांची चौकशी केली जात आहे आणि आणखी दहशतवादी लपून बसले आहेत का याची माहिती मिळवण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याचे सूत्रांनी पुढे सांगितले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी निर्बंधित परिसरामध्ये जाण्यासाठी वाहतूक बंद केली आहे आणि शोधमोहीम सुरू असेपर्यंत परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.काकोरी हा लखनऊमधील दाट लोकवस्तीचा परिसर आहे, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ताज्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कायदा व सुवस्थेने एडीजी आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणार असून त्यावेळी या कारवाईविषयी अधिक माहिती समोर येईल.