जळगाव : मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरुन हेमंत नवनीतलाल दुतिया (वय ४८,रा.धरणगाव) यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांच्यासह १४ जणांविरुध्द सोमवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेमंत नवनीतलाल दुतिया हे पत्नी गौरी, मुलगी व सासरे हरेश प्रेमजी भाटे यांच्यासह रविवारी खान्देश सेंट्रल मॉलमधील चित्रपटगृहात ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट बघायला आले होते. पावणे सात वाजता चित्रपट संपल्यानंतर दुतिया बाहेर आले असता शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, राजेंद्र किसन महाजन, धीरेंद्र पुरभे (रा.धरणगाव), शोभा चौधरी, सरिता माळी, भिमा धनगर (रा.नेहरु नगर) व इतर ४ ते पाच जणांनी घेरुन तू मुख्यमंत्र्यांविरुध्द फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट का टाकली असा जाब विचारला, त्यावर आपण अशी कोणतीच पोस्ट टाकली नाही असे सांगितले असता या लोकांनी आपल्यावर आरोप लावून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
पत्नी गौरी वाद सोडविण्यासाठी आली असता या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले असून त्याचे नुकसान झालेले आहे. त्याशिवाय त्यांच्या उजव्या हाताला मार लागला आहे. या मारहाणीत दुतिया यांच्या नाकातोंडातून रक्त आले. या लोकांनी जीवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.