मीरा रोड - राज्यात सत्तासंघर्षात शिवसेना-भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी रात्री भाजपा अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना खान यांच्यावर काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. सुलताना त्यांच्या पतीसोबत डॉक्टरांना भेटण्यासाठी जात असताना हा हल्ला झाला. काही बाईकस्वारांनी सुलताना यांची कार रोखली आणि त्यांच्या वाहनावर हल्ला केला.
या हल्ल्यात सुलताना खान जखमी झाल्या. भाजपा नेत्या सुलताना खान यांचे पती म्हणाले की, रात्री ११ च्या सुमारास मी माझ्या पत्नीसह डॉक्टरांना भेटण्यास जात होतो. त्यावेळी मीरा रोड परिसरात २ बाईकस्वार आमच्या कारसमोर अचानक आले. त्यांनी बाईक उभी केली आणि शिवीगाळ करत धारदार शस्त्राने आमच्या वाहनावर हल्ला करत पत्नी सुलताना खान यांच्यावर हल्ला केला. त्यात पत्नी सुलताना जखमी झाली. या हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले अशी माहिती त्यांनी दिली.
या हल्ल्यावेळी पतीने आरडाओरड केल्यानंतर आसपासचे लोक मदतीसाठी धावले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जखमी अवस्थेत असलेल्या सुलताना खान यांना जवळच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेनंतर पीडित नेत्या घाबरलेल्या अवस्थेत होत्या. त्या जबाब देण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. पीडित महिलेचा जबाब नोंदवला जाईल त्यानंतर दोषी आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
हॉस्पिटलचे डॉ. राम लखन यादव म्हणाले की, सुलताना यांच्या हातावर २ जखमा झाल्या आहेत. त्यांना ३ टाके लावून पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, हे हल्लेखोर कोण होते त्यांनी जीवघेणा हल्ला का केला त्याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. तर पक्षातंर्गत वादामुळे हा हल्ला झाल्याचा संशय सुलताना खान यांचे पती यांनी व्यक्त केला आहे. सुलताना यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नेतृत्वाकडे लिखित तक्रार दिली होती. त्यामुळे हा हल्ला झाल्याचं सुलताना यांच्या पतीला वाटतं. मात्र सध्या सुरु असलेल्या राजकीय संघर्षामुळे पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. लवकरच आरोपींना जेरबंद करू असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.