लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : नशेत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. तसेच दगड मारून एका चारचाकी वाहनाची काच फोडून नुकसान केले. फुगेवाडी येथे शनिवारी (दि. ९) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
यशवंत श्रीमंत कांबळे (वय ४३, रा. जुनी सांगवी), असे जखमी झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. कांबळे हे आम आदमी पार्टीच्या सामाजिक न्याय विंगचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून कोयता जप्त केा आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीतर्फे पिंपरी येथे शनिवारी आंदोलन झाले. आंदोलनानंतर कांबळे हे दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी फुगेवाडी येथे तीन अल्पवयीन मुले एका दुचाकीवरून कांबळे यांच्या दुचाकीच्या मागून आले. दुचाकीवर मागे बसलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या हातात कोयता होता. त्या कोयत्याने त्याने कांबळे यांच्यावर वार केला. त्यामुळे कांबळे यांच्या डोक्याला दुखापत होऊन ते जखमी झाले. त्यानंतर अल्पवयीन मुलांनी दगडाने चारचाकी वाहनाची काच फोडून नुकसान केले. जखमी झालेल्या कांबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
‘आप’चे शहरात चांगले काम आहे. तसेच मी पक्षाचा शहरस्तरावरील पदाधिकारी आहे. त्यामुळे राजकीय सूडबुद्धीतून हा हल्ला करण्यात आला आहे, असे यशवंत कांबळे यांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.