नितीन पंडित
भिवंडी - भिवंडी शहरातील लाहोटी कंपाऊंड परिसरात भाजपाचे माजी नगरसेवक नित्यानंद नाडर उर्फ वासू अण्णा यांच्यावर गुरुवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आली आहे.लाकडी दांडके दगड याच्या साहाय्याने त्यांच्या मर्सिडीज कारवर हल्लेखोरांनी हल्ला केल्याने नित्यानंद नाडार यांच्या डोक्यावर तोंडावर गंभीर दुखापत झाली असून कारचे ही नुकसान झाले आहे.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एकास ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला पक्षांतर्गत वादातून झाला असल्याची शंका नाडार यांनी व्यक्त केली आहे.
भाजपा माजी नगरसेवक नित्यानंद नाडार यांचे लाहोटी कम्पाऊंड येथे कार्यालय असून आपल्या कार्यालयातील काम संपवून रात्री नऊ वाजता ड्रायव्हर व बॉडीगार्ड सोबत आपल्या कारमधून घरी जाण्यासाठी निघाले असताना कार्यालया पासून १०० फुटावर एकाने रस्त्यात कार थांबविली. त्यावेळी दबा धरून बसलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्यांनी अचानक त्यांच्या गाडीवर दगड व लाकडी दांडक्याने हल्ला चढवत गाडीची काच फोडली व कार मध्ये बसलेल्या नित्यानंद नाडार याच्यावर सुद्धा हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यात नित्यानंद नाडार हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे पोलीस अधिकारी फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली .तर नित्यानंद नाडार यांनी शहर पोलीस ठाण्यात सतीश बाविलाला,देवा कोळी,इब्राहिम,साईनाथ दासी व त्यांच्या सोबत असलेल्या दहा ते बारा जणांनी हल्ला केल्याची तक्रार दिली असता पोलिसांनी मारहाण व जखमी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवीत सतीश बाविलाला यास ताब्यात घेतले आहे.
भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यात होणार असताना वार्डात अनेक जण इच्छुक तयारीला लागले असल्याने त्यामधून वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली आहे.त्यातून हा हल्ला पक्षाच्या अंतर्गत वादातुन झाला असल्याचा आरोप जखमी माजी नगरसेवक नित्यानंद नाडर यांनी केला असून पक्षात लॉबिंग सुरू असल्याने या बाबत मी पक्षातील वरिष्ठांना याबाबत सांगितले होते.तरी माझ्यावर हल्ला झाला असल्याचा आरोप नाडार यांनी केला आहे. तर हल्ला करणाऱ्या टोळक्यांचा शोध सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी सुरू केला असून एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी दिली आहे.