Attack on MLA Pradnya Satav: आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर गावात हल्ला; पाठीवर चापट, धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 11:24 PM2023-02-08T23:24:38+5:302023-02-08T23:30:03+5:30

Attack on MLA Pradnya Satav:  हल्ला पूर्वनियोजीत असल्याचा आ.सातव यांचा आरोप....

Attack on MLA Dr. Pragya Satav in Kasbe Dhanwada village at hingoli; Slap on the back | Attack on MLA Pradnya Satav: आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर गावात हल्ला; पाठीवर चापट, धक्काबुक्की

Attack on MLA Pradnya Satav: आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर गावात हल्ला; पाठीवर चापट, धक्काबुक्की

googlenewsNext

हिंगोली: विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात सायंकाळी साडे सातच्या सुमारास एका व्यक्तीने हल्ला केला. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप करत जीविताला धोका असल्याची माहिती स्वतः आमदार प्रज्ञा सातव यांनी समाज माध्यमांमधून पोस्ट टाकून दिली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ माजली आहे .

याप्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव या काँग्रेस पक्षाच्या हात से हात जोडो अभियानात नियोजित दौऱ्यानिमित्त कळमनुरी तालुक्यातील कसबे धांवडा गावात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, भागवत चव्हाण, उमाकांत शेवाळकर, गणेश लोखंडे, ब्रह्मानंद काळे, बाळू पाटील व इतर उपस्थित होते. या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. त्यांच्याशी हुजत घालत पाठीमागून येवून धक्काबुक्की केल्याचीही चर्चा आहे. त्या गावात पोहोचल्यानंतर आधी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्नही या इसमाने केला होता.

या प्रकरणानंतर डॉ. प्रज्ञा सातव यांनी थेट कळमनुरी पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस निरीक्षक निकाळजे यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. सदर आरोपीने आमदार सातव यांच्या पाठीत चापट मारल्याचेही त्यांनी सांगितले असल्याचे पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी सांगितले. त्यानंतर या घटनेबाबतची माहिती त्यांनी थेट समाज माध्यमांवर टाकली असून "माझ्यावर झालेला हा हल्ला एका अज्ञात व्यक्तीने मागून येऊन केला. माझी मुले लहान आहेत. मी कुणाचेही वाईट केले नाही. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका आहे. तरीही मी लोकांसाठी काम करीत राहीन.  राजीवभाऊंच आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई,  इंदिराजी यांच्यासारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनीही घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता ." असा आरोपही आमदार प्रज्ञा सातव यांनी समाज माध्यमांवरील पोस्टवरून दिला आहे. अशीच पोस्ट त्यांनी ट्विटरवर सुद्धा केली. एकंदरीत ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरात गोंधळाचे वातावरण पसरले आहे.

या संबंधातील बाळापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांच्याशी चर्चा केली असता त्यांना सदर घटनेबाबत काहीच ज्ञात नसल्याचे त्यांनी सांगितले. समाज माध्यमांवरील माहिती व पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसारच हा हल्ला झाल्याचे समजले आहे. सदर ठिकाणी बाळापुर पोलीस पोहोचले असले तरी हल्लेखोर व्यक्ती हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे बोधनापोड यांनी सांगितले. सदर व्यक्तीचे नाव महेंद्र तुकाराम डोंगरदिवे राहणार कसबे तांडा असे असल्याचेही त्यांनी सांगितले .हे वृत्त लिहीपर्यंत सदर  हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले नव्हते किंवा यासंबंधी कोणतीही तक्रार बाळापुर पोलीस ठाण्यात प्राप्त झाली नव्हती. हल्ला झालेले गाव हे बाळापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असतानाही आमदार प्रज्ञा सातव मात्र या घटनेची माहिती देण्यासाठी कळमनुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यामुळे बाळापुर पोलीस ठाण्यात यासंबंधीची माहिती उपलब्ध नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार प्रज्ञा सातव म्हणाल्या, अशा भ्याड हल्ल्याला घाबरत नाही. समोरून येऊन लढण्याचे आव्हानही त्यांनी दिले. माझे पक्षाचे काम मी चांगल्या पद्धतीने करत असल्याने काहींच्या पोटात दुखत आहे एका महिला आमदारावर हल्ला होत असेल तर इतर महिला सुरक्षित आहेत का ?असा सवालही सातव यांनी केला. तर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Attack on MLA Dr. Pragya Satav in Kasbe Dhanwada village at hingoli; Slap on the back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.