मुंबई : पत्नीसह कुटुंब सोडून जाण्यास शेजारीच जबाबदार असल्याचा रागातून ग्रँट रोडमध्ये एका व्यक्तीने शुक्रवारी शेजारी राहणाऱ्या पाचजणांवर चाकूने सपासप वार केले, त्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नायर आणि रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पार्वती मॅन्शन या रहिवासी इमारतीत राहणारा हल्लेखोर चेतन गाला (५४) यास डीबी मार्ग पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. हल्ल्यात जयेंद्रभाई मिस्त्री (७७), इलाबाई मिस्त्री (७०) आणि जेनील ब्रह्मभट्ट (१८) यांचा मृत्यू झाला असून, स्नेहल ब्रह्मभट्ट (४६) आणि प्रकाश वाघमारे (५४) यांची प्रकृती गंभीर आहे.
चेतन हा पत्नी, तीन मुली आणि एक मुलासोबत राहत होता. त्याचे कपड्याचे दुकान आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो घरीच होता. यातूनच दोन महिन्यांपूर्वी त्याचा पत्नीसोबत वाद झाला. रागात पत्नी, मुलासह सासऱ्याच्या घरी राहण्यास गेली. शुक्रवारी दुपारी मुलगी जेवणाचा डबा देऊन घरी गेली. त्यानंतर साडेतीनच्या सुमारास रागाच्या भरात मिस्त्री दाम्पत्यावर गाला याने चाकूने वार केले.
चाकूने केले सपासप वारवाटेत येणाऱ्या प्रत्येकांवर त्याचा हल्ला सुरू होता. चेतनने जेनीलच्या गळ्यावर तर स्नेहल यांच्या पोटावर आणि मानेवर वार केले. त्याच रक्ताच्या थारोळ्यात त्यांनी पहिल्या मजल्यावर धाव घेतली. शेजारच्यांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविले. दिवसाढवळ्या या गजबजलेल्या भागात हत्येचा हा थरार सुरू हाेता.
हत्येपूर्वी मुलाशी संपर्कघटनेच्या काही वेळापूर्वी गाला याने मुलाला फोन करून आईसह घरी येण्यास सांगितले. मात्र, त्यांनी येणार नाही असे सांगितल्याने त्याच्या रागात भर पडली आणि शेजारच्यामुळे पत्नी, कुटुंब दुरावल्याच्या रागात त्याने चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती त्याच्या चौकशीतून समोर आली.