पिंपरी : फुलांची ऑर्डर रद्द केल्याच्या रागातून एकावर कोयत्याने वार करुन प्राणघातक हल्ला केल्याची घटना निगडीतील प्राधिकरण येथे रविवारी (दि. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. पांडुरंग दत्तात्रय अवघडे (वय ३०, रा. बालवडकर चाळ, अष्टविनायक चौक, बालेवाडी, पुणे), अरुण मारुती सुकरे (वय ३४, रा. सौरभ कॉम्प्लेक्स, रुम नं, २५, वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गौतम खेमचंद जैन (वय ५४, रा.शुक्रवार पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौतम जैन यांचे भाऊ दिलीप जैन (रा. आयुर्वेदिक कॉलेजसमोर, प्राधिकरण, निगडी) यांच्या घरी रविवारी देवाच्या मूर्ति प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम होता. यासाठी दिलीप जैन यांनी आरोपीला फुलांची ऑर्डर दिली होती. मात्र, ती जैन यांनी नंतर रद्द केली.ऑर्डर रद्द केल्याचा राग मनात धरुन आरोपी पांडुरंग अवघडे हा त्यांच्या घरी आला. फिर्यार्दी गौतम जैन यांच्यावर कोयता उगारुन त्यांना बाजूला ढकलले. तसेच दिलीप जैन यांच्या हातावर, डोक्यावर, हातावर कोयत्याने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपींना अटक केली आहे.
निगडीत फुलांची ऑर्डर रद्द केल्याने एकावर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 3:22 PM