लखनौ - उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा एका दारु माफियाला अटक वॉरंट देण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी, दारुमाफियांनी पोलिसांवर हल्ला केला, यामध्ये एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला असून एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी जिल्हाधिकारी चंद्रप्रकाश सिंह यांनी पत्रकाराना माहिती दिली.
मंगळवारी सायंकाळी सिढपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कुमार आणि आरक्षी देवेंद्र नगला हे धीमर गावात एका दारुमाफियाच्या शोधासाठी गेले होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या हल्ल्यात पोलीस मित्र देवेंद्र हे शहीद झाले आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी माहिती देताना म्हटले की, याप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेतली असून आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. तसेच, मृत्युमुखी पडलेल्या पोलीस शिपायाच्या वारसांपैकी एकास सरकारी नोकरी आणि 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्याही सूचना केल्या आहेत. या घटनेची सातत्याने चौकशी करण्याचं कामही योगी आदित्यनाथ करत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस निरीक्षकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आम्ही मोती नावाच्या आरोपीला अटक वॉरंट देण्यासाठी गेलो असता, त्यांच्या साथीदारांनी आम्हाला पकडले आणि मारहाण केली, असे जखमी पोलीस अधिकारी अशोक कुमार यांनी पोलीस फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशि दिल्याचे राज्य सरकारच्या एका प्रवक्त्याने सांगितले. गुन्हा आणि गुन्हेगारांविरुद्ध राज्य सरकार किंचितही दया-माया दाखवणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कुणाशीही तडजोड न करता, संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्प्ट केलंय.