नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आयशे घोष यांना जेएनयू परिसरात बेदम मारहाण करण्यात आली आहे. घोष याने दिलेल्या माहितीनुसार, मास्कधारी अज्ञातांनी घोषवर हल्ला केला. तसेच मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात जखमी झालेल्या घोषचा चेहरा रक्तबंबाळ झाला असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. डाव्यांनी या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (ABVP) हात असल्याचा संशय वर्तविला आहे.
आज सायंकाळी जेएनयू शिक्षक संघटनेने विद्यार्थी संघटनांची बैठक बोलावली होती. त्यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटना आणि ABVP या दोन विद्यार्थी संघटनेत तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, एक शिक्षक देखील या हाणामारीत जखमी झाल्याचे व्हिडिओत दिसून आले आहे.
जेएनयूने पुकारले होते आंदोलन गेल्या काही दिवसांपासून हॉस्टेलच्या नियमात बदल यासोबतच फी वाढ, विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयांना टाळे लावल्याविरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. तसेच विद्यार्थ्यांना ड्रेस कोडचे देखील निर्बंध लादल्याने विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात येत होता. यानंतर विद्यापीठ प्रशासनानं शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला. शिक्षण सचिव आर. सुब्रमण्यन यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली होती. जेएनयूच्या प्रशासकीय समितीनं वसतिगृहाच्या शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतल्याचं सुब्रमण्यन यांनी म्हटले होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करुन पुन्हा वर्गांमध्ये जावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. तसेच केंद्र सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन करुन फी दरवाढीवर उपाय योजण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, फी दरवाढीचा मागे घेण्यासाठी जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता. हा वाद चिघळला असून पोलिसांनी काही विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी एम्समध्ये भरती केलेल्या 18 विद्यार्थ्यांची भेट घेऊन विचारपूस केली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मारहाणीच्या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. जेएनयूच्या आवाराला पोलिसांनी वेढा घातला असून काही आरोपींची ओळखही पटविली आहे.