महाड - महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनाजी गुरव यांच्यावर शुक्रवारी महाविद्यालयातच प्राणघातक हल्ला करण्यात आला. जखमी डॉ.गुरव यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्लेखोरांना पकडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी महेंद्र घारे, महेंद्र वानखेडे यांच्यासह पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्राचार्य डॉ.धनाजी गुरव हे महाविद्यालयातील रूम नं. १५मध्ये असलेल्या सभागृहामध्ये बैठक घेत असताना, अचानक महेंद्र घारे आणि त्याच्या साथीदारांनी लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉड घेत या सभागृहात प्रवेश केला व त्यांनी डॉ.गुरव यांना मारहाण करीत सभागृहातील मालमत्तेचे नुकसान केले. या हल्ल्यामध्ये डॉ.धनाजी गुरव यांच्या हाताला आणि पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी गजानन शिंदे यांनी या हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी त्यांच्या पाठीतही लोखंडी रॉड मारून दुखापत केली.डॉ.धनाजी गुरव यांनी या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रचार्यपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर इतर लोकांना प्राचार्य होता येत नाही आणि महाविद्यालयाच्या पैशांवर डल्ला मारता येत नाही, याचा राग धरून हा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी महेंद्र दत्तात्रेय घारे (३३, रा. सुंदरवाडी, महाड), महेंद्र वानखेडे (महाड) या दोघांसह पाच ते सहा व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस हे करीत आहेत.खासगी अंगरक्षक तैनात या महाविद्यालयात अनेक खासगी अंगरक्षक व बाउन्सर तैनात ठेवण्यात आले असून, यामुळे महाविद्यालयात विद्यार्थी तणावाखाली वावरत असल्याची बाब उघडकीस येत आहे. या अंगरक्षक व बाउंन्सरवर दरमहा लाखो रुपये खर्च केला जात आहे. या महाविद्यालयात पदभार स्वीकारण्यासाठी दरवेळी मोठी रस्सीखेच होत असून, प्राचार्यपदासाठी गेली काही वर्षे संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. या महाविद्यालयात मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असतानाही संस्थेचे व मुंबई विद्यापिठाचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यावर हल्ला, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 2:16 AM