गोंदिया : फसवणुकीच्या प्रकरणात हव्या असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीच्या भावाने हल्ला करून धमकावणी दिली. प्रकरणी दोघा भावांना पोलिसांनी अटक केली आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत दीनदयाल वॉर्ड येथे बुधवारी (दि.३०) रात्री १०.३० वाजतादरम्यान ही घटना घडली.
सविस्तर असे की, आरोपी राहुल डहाट (रा.दिनदयाल व़ॉर्ड) याच्यावर ३ मोबाईल अपहार प्रकरणात मार्च महिन्यात फसवणुकीचा गुन्हा रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल आहे. त्यामुळे राहुल हा पोलिसांना हवा होता. बुधवारी तो आपल्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद रघुवंशी पथकासह त्याला अटक करण्यासाठी रात्री १०.३० वाजतादरम्यान त्याच्या घरी गेले. तेथे आरोपीचा भाऊ रजत डहाट त्याला वाचविण्यासाठी खोट बोलू लागला व पोलीस पथकावर विटा फेकल्या. तसेच तलवार घेऊन पोलिसांना धमकी देऊ लागला. याबाबत माहिती मिळताच रामनगरचे निरीक्षक प्रमोद घोंगे घटनास्थळी गेले व पथकाने रजतला ताब्यात घेतले असता राहुल डहाट ही मिळून आला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तलवार जप्त केली आहे. तर पळून जाण्यासाठी रजतने सपोनि रघुवंशी यांच्या हाताला चावा घेतला. प्रकरणी रामनगर पोलिसांनी भादवि कलम ३५३, ३३२, २९४ भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.