पुणे : परदेशी मांजरपालन व विक्री व्यवसायाच्या व्यावसायिकावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्याची घटना कात्रज भागात घडली आहे. मांजर पालन व्यवसायातील व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाला असल्याचा संशय या तरुणाने व्यक्त केली आहे. यासीन रियाज नदाफ (वय २६ रा़ संतोषनगर, कात्रज) असे जखमी झालेल्या या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याचा मित्र पियुष अमृतलाल कवया (वय ३०, रा़ साईलिला, जांभुळवाडी रोड, आंबेगाव) हाही जखमी झाला आहे. याप्रकरणी यासीन नदाफ यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन नदाफ हे मूळचे गोव्याचे आहेत. सध्या परदेशी जातीची कुत्री, मांजरी पाळण्याचे प्रमाण पुण्यात वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नदाफ यांनी परदेशी मांजरी पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायात त्यांच्याबरोबरच आणखी दोन ते तीन जण अशा प्रकारे मांजरी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. परशियन जातीच्या मांजरीचे ब्रीडिंग ते करतात़ २० जून रोजी रात्री त्यांना व्हॉट्सअॅपवर कॉल करून बोलाविण्यात आले़. त्यानुसार ते कात्रज येथील जेपीएसएस चौकाजवळ गेले. त्यावेळी दुचाकीवरून दोघे जण तेथे आले. आरोपींनी नदाफ यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून ओळख पटवली. त्यानंतर दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने नदाफ यांच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केला. दुचाकीस्वार आणि त्याचा साथीदार तेथून पसार झाले. मांजर पालन व्यवसायातील स्पर्धेतून आपल्यावर हल्ला करण्यात आला असावा, असा संशय नदाफ यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील तपास करत आहेत.
परदेशी मांजरांच्या ब्रीडिंग व्यावसायिक स्पर्धेतून तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 8:03 PM