सातारा : शहराजवळील कृष्णानगरमध्ये उधारी मागितल्याच्या कारणावरुन फळविक्रेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी चाैघांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ५ जून रोजी सायंकाळच्या सुामरास कृष्णानगर येथील फळविक्रेत्याने उधारी मागितली होती. त्यामुळे या रागातून चाैघांनी धारदार शस्त्राने विक्रेत्याच्या पोटात वार केले. यामध्ये विक्रेता गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर विजय गाेरख ओव्हाळ (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली. पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला होता. त्यातील एक आरोपी पोलिस रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार होता.
हा गुन्हा घडल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांना सूचना केली होती. त्यानुसार शहा यांनी गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला केली. त्यानंतर माहितीनुसार कोल्हापूरला जाऊन मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी एकूण चाैघांना अटक करण्यात आली आहे.
बाॅबी अॅंथनी ब्रुक्स (वय ३०) आणि साैरभ प्रवीण कांबळे (वय २५, दोघेही रा. केसरकर पेठ, सातारा), चंद्रकांत मनोहर जगदाळे (वय ३८, क्षेत्रमाहुली, सातारा) आणि संतोष अशोक लंकेश्वर (वय २३, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अनिल वाघमोडे, हवालदार सुजीत भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, विक्रम माने, संतोष कचरे, सागर गायकवाड, सुशांत कदम, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, प्रसाद जाधव यांनी सहभाग घेतला.