लुधियाना - येथे शिवसेनेच्या संदीप थापर या नेत्यावर चार निहंगांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एका पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर, सरकारी रुग्णालयाजवळील संवाद ट्रस्टच्या कार्यालयातून बाहेर येत असताना, थापर याच्यावर हल्ला करण्यात आला. ट्रस्टच्या कार्यालयाबाहेर थांबलेल्या चार ‘निहंगांनी’ थापरवर तलवारीने हल्ला केला आणि यामध्ये थापर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, असे पोलिसांनी सांगितले. हल्ला केल्यांनतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.
संदीप थापर हे शहीद सुखदेव सिंह यांचे नातेवाईक आहेत. थापर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पंजाबमध्ये गुंडाराज सुरू असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. कुठल्याही व्यक्तीवर अशाप्रकारे जीवघेणा हल्ला करणे खूप निंदनीय आहे. पंजाबमध्ये कायद्याचे धिंडवडे उडवले जात आहेत. या हल्ल्यानं पंजाबमध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. लुधियानामध्ये दहशत पसरली आहे. दुकानदार, व्यापारी घाबरलेत, शाळकरी मुले शाळेत जायला भीत आहेत असा आरोप त्यांनी केला.